पुणे : ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या मराठी साहित्याचा आदर करून टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडीतून गडकरींच्या पुतळ्याला अनोखी मानवंदना देण्यात आली. पुण्यातील कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्था वाचन मंदिरातर्फे आयोजित या कार्यक्रमाला कसबा पेठेसह संपूर्ण शहरातील साहित्यप्रेमींनी हजेरी लावली. गडकरींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात त्वष्टा कासार वाचन मंदिरापासून आयोजित ग्रंथदिंडीने झाली. गडकरी यांची साहित्यक्षेत्रातील निवडक ग्रंथसंपदा व पुतळा पालखीत ठेवण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, दादा पासलकर, मोहन शेटे, वाचन मंदिराचे अध्यक्ष अजित पिंपळे, पतित पावन संघटनेचे सरचिटणीस सुनील तांबट, किशोर कर्डे आदी उपस्थित होते. वाचन मंदिरापासून निघालेल्या दिंडीचा समारोप तांबट हौद मार्गे याज्ञवल्क्य आश्रम येथील निवासस्थानी झाला. कसबा पेठेतील याज्ञवल्क्य आश्रमासमोर पिंपळाच्या पाराजवळ इतिहासप्रेमी मंडळातर्फे गडकरी मानवंदना हा कार्यक्रम घेण्यात आला. गडकरींच्या कविता, नाट्यप्रवेश यांचे वाचन या वेळी करण्यात आले.अजित पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. किशोर कर्डे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
राम गणेश गडकरींना ग्रंथदिंडीतून मानवंदना
By admin | Published: January 25, 2017 2:22 AM