पुणे : प्रभू श्रीराम हा आमच्या भक्तीचा विषय आहे, राजकारणाचा नाही. जे आज राम राम करत आहेत, त्यांनी रस्त्यावर रामाची भक्ती करण्यापेक्षा देवळात जाऊन किती वेळा भक्ती केली ते सांगावे अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली. आम्ही रामाचे भक्त नाही हे त्यांनी सिद्ध करावे असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक येत्या मंगळवारी २३ जानेवारीला काँग्रेसभवनमध्ये होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी रामची भक्ती हा वैयक्तिक विषय असल्याचे सांगितले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश महिला पदाधिकारी संगीता तिवारी, माजी नगरसेवक सतीश दरेकर, ज्येष्ठ नागरिक काँग्रेसचे अध्यक्ष द. स. पोळेकर यावेळी उपस्थित होते.
शिंदे यांनी सांगितले की सातारा, सांगली, कोल्हापूल, सोलापूर व पुणे अशा ५ जिल्ह्यांची बैठक २३ जानेवारीला पुण्यात होत आहे. पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या बैठकीत सर्व जिल्ह्याचा शहर व ग्रामीण याप्रमाणे आढावा घेणार आहेत. यात पक्षाच्या जिल्हा, शहराध्यक्षांपासून ते थेट बूथ समित्यांपर्यंतची माहिती घेतली जाईल.ङे, काही सुचना केल्या जातील. लोकसभा मतदारसंघांचे नियोजन केले जाईल.
चेन्नीथला यांच्या आदेशावरून त्यांच्याच उपस्थितीत राज्यात सर्वत्र अशा बैठका होत आहेत. भारतीय जनता पक्ष काँग्रेसमधील युवा नेत्यांना त्यांच्याकडे घेत आहे, पश्चिम महाराष्ट्रात असे आणखी कोणी आहे का याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की भाजप याच पद्धतीने काम करत आहे, काही नावे ऐकू येतात, पण खात्रीलायक काहीच सांगता येत नाही.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे, उमेदवारी मेरिट पाहूनच दिली जाईल. संघटनात्मक स्तरावर आमची सर्व रचना पूर्ण झाली असून पक्ष निवडणुक लढवण्यासाठी सज्ज आहे असा दावा शिंदे तसेच ॲड. छाजेड यांनी केला. विभागीय बैठकीसाठी सुमारे ५०० पदाधिकारी व १ हजार कार्यकर्ते येतील. सकाळी साडेदहा वाजता पहिली बैठक पुण्याची होईल, त्यानंतर सलग बैठका होतील असे शिंदे यांनी सांगितले.