राम आमचाही, पण त्याचे राजकारण करणे अयोग्य; रमेश चेन्नीथलांची भाजपवर टीका
By राजू इनामदार | Published: January 23, 2024 04:54 PM2024-01-23T16:54:57+5:302024-01-23T16:57:35+5:30
राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले....
पुणे :काँग्रेसकडे महात्मा गांधी यांची सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची विचारधारा आहे, ज्यांच्याकडे कसली विचारधारा नाही असे लोक मथूरा आणि काशी असेच बोलणार अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. राम आमचाही आहे, मात्र राम मंदिर व राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकारण करणे अयोग्य आहे असे ते म्हणाले.
पक्षाच्या लोकसभा निवडणूकपूर्व विभागीय बैठकीसाठी चेन्नीथला मंगळवारी पुण्यात आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर संवाद साधला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सोनल पटेल व काँग्रेसचे अन्य राज्य पदाधिकारी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. चेन्नीथला यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, सोमवारी राम मंदिर उदघाटनाच्या कार्यक्रमाचे राजकीय भांडवल केले गेले जे अतीशय चुकीचे होते. त्यांच्याकडे कोणताही विचार नाही, नेते नाहीत. त्यामुळेच ते विकासाच्या मुद्द्यावर, बेरोजगारीच्या मुद्द्यावर राजकारण करू शकत नाहीत. त्यातूनच ते अयोध्येनंतर आता काशी, मधूरा असेच बोलत राहणार. काँग्रेसला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचे असते. तशा प्रकारच्या राजकारणावरच आम्ही काम करत आलो आहोत.
काँग्रेसचे अनेक नेते भाजपची वाट धरत आहेत याकडे लक्ष वेधल्यानंतर चेन्नीथला म्हणाले, जे पदाच्या मागे धावतात तेच असा बदल करतात. भाजपकडे नेतेही नाहीत, त्यामुळे ते कधी इडीची धमकी देऊन तर कधी पदांची लालूच दाखवून अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेतात. कोणी असे जात असेल तर त्याचे आम्हाला काही वाटत नाही, याचे कारण असे लोक कुठेही जात असतात.
काँग्रेस आता देशातील भाजप विरोधकांमध्ये ऐक्य करण्याच्या प्रयत्नात आहे. तो एकोपा आम्हाला वाढवायचा आहे. इंडिया आघाडीत अनेक पक्ष आहेत, जागा वाटप आम्ही एकमेकांना समजून घेऊन करू, प्रकाश आंबेडकर आमच्या बरोबर यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते येतील. अजूनही बरेच जाण आहेत. इंडिया आघाडी भक्कम होईल असा दावा चेन्नीथला यांनी केला.
राहूल गांधी यांची भारत न्याय यात्रा उधळून लावण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप चेन्नीथला यांनी केला. यात्रेत अडथळा निर्माण केला जात आहे. पोलिसांची परवानगी नाकारणे, प्रवेश बंदी करणे यासारखे प्रकार केले जात आहेत. राहूल गांधी यांची ही यात्रा न्याय मागण्यासाठीची यात्रा आहे, नागरिकांचा यात्रेला मिळणारा प्रतिसादच त्यांना त्रासदायक होतो आहे असे ते म्हणाले.