राम आमचाही, पण २२ जानेवारीला रामनवमी नाही - नाना पटोले  

By राजू इनामदार | Published: January 3, 2024 08:01 PM2024-01-03T20:01:58+5:302024-01-03T20:03:21+5:30

पक्षाच्या पुणे लोकसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी म्हणून नाना पटोले बुधवारी पुण्यात आले होते.

Ram is ours too, but not Ram Navami on January 22 says Nana Patole | राम आमचाही, पण २२ जानेवारीला रामनवमी नाही - नाना पटोले  

राम आमचाही, पण २२ जानेवारीला रामनवमी नाही - नाना पटोले  

पुणे : राम आमचाही आहे, पण २२ जानेवारीला ना रामनवमी आहे, ना अन्य काही. भारतीय जनता पक्ष प्रेरित कार्यक्रम त्यादिवशी आहे, त्यामुळे त्याविषयी काय बोलायचे, असा प्रश्न करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस २२ जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटनाला फार महत्त्व देत नसल्याचे सूचित केले. ‘इंडिया’ आघाडी भक्कम असून, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आम्हीच बाजी मारणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पक्षाच्या पुणे लोकसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी म्हणून पटोले बुधवारी पुण्यात आले होते. आमदार रवींद्र धंगेकर, विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, पक्षाचे पुण्यातील तसेच प्रदेश स्तरावरील अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. काँग्रेसभवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केली. ‘राम तुमचा आमचा सर्वांचाच आहे, मात्र, २२ जानेवारीला प्रतिष्ठापना होणारा राम भाजप प्रेरित आहे. मंदिरांचे बांधकाम अपूर्ण असतानाच त्यात प्रतिष्ठापना केली जात आहे. यात राजकारण आहे,’ असे पटोले म्हणाले.

इंडिया आघाडी भक्कम आहे. त्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे जास्त भक्कम आहेत. आमचे जागा वाटप, कोणी कसे लढायचे, या सर्व गोष्टी होतील. त्या त्या पक्षांचे वरिष्ठ नेते ते ठरवतील तोपर्यंत आमच्याविषयी कोण काय बोलत आहे, याला आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. आमचे सगळे ठरले आहे. भाजपविषयी मतदारांमध्ये रोष आहे. तो लोकसभा निवडणुकीतच नाही तर त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत बाहेर पडेल.

काँग्रेस संघटना पातळीवर क्षीण झाली आहे. पुण्यातील काँग्रेसभवन इतर दिवशी ओसाड असते, याविषयी विचारले असता पटोले यांनी कार्यकर्ते बाहेर काम करत असतात, असे सांगितले. पुण्यातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस जिंकेल, असे आधीच सांगितले होते. त्यावेळी सर्वजण हसले होते, मात्र काँग्रेसचाच विजय झाला. लोकसभेलाही पुण्याची जागा महाविकास आघाडीच जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Ram is ours too, but not Ram Navami on January 22 says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.