लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’चे हरवलेले सूर... ना आकर्षक विद्युत रोषणाई... ना भजन कीर्तनाने रंगणारा आसमंत... अशा वातावरणात सलग दुसऱ्या वर्षी रामनवमी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. मात्र, रामनवमीनिमित्त अर्धा ते एक तासासाठी राममंदिरे उघडून रामजन्म सोहळा मंदिरांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत धार्मिक पद्धतीने पार पडला. शहरामध्ये संचारबंदी लागू असल्याने हा अनुपम सोहळा भाविकांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता आला नाही.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमीदिनी श्रीराम जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मठ-मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण होते. काही ठिकाणी रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. मात्र, यावर्षी साधेपणाने नवमी साजरी केली. शहरातील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी तुळशीबागेतील राम मंदिरा अडीचशे वर्षे जुने आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीनिमित्त मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. रामजन्मापूर्वी रामाला परिधान करण्यात येणाऱ्या पोषाखाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मुख्य पूजा आणि रामजन्म सोहळा झाल्यावर रामाच्या वस्त्राचा लाल रंगाचा तागा भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. कोरोना प्रादुर्भावामुळे रामनवमीचा उत्सव यंदा सलग दुसऱ्या वर्षी रद्द केला. नागरिकांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणे टाळावे असे आवाहन केले होते. त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा झाल्याची माहिती श्री रामजी संस्थानचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी ‘लोकमत’ ला दिली.
दरम्यान, उपनगरांमध्यील राममंदिरांमध्ये रामजन्म सोहळा पार पडला. मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंदिराबाहेरची मोहक रंगावली लक्ष वेधून घेत होती. मात्र, पुण्यातील अन्य राम मंदिरांमध्येही रामनवमीचे कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. एकत्र येणे शक्य नसल्याने काही धार्मिक संस्थांनी ऑनलाइन कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केल्याचे पाहायला मिळाले.