लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “संघटन ही कलीयुगातील सर्वांत मोठी ताकद असून, त्याची प्रचिती राममंदिर निर्मिती प्रक्रियेतून येत आहे. पुढील काळात राममंदिर हे भारताच्या संघटन शक्तीचे दर्शन घडवेल,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.
नवचैतन्य प्रकाशन आणि माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत जोशी यांनी लिहिलेल्या एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या ‘विश्वधर्मी विश्वनाथतत्त्व’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी जोशी बोलत होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष डॉ. गोंविददेव गिरी महाराज, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, देहू येथील शिवाजी महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.
भैयाजी जोशी म्हणाले की, सध्या मानसिक व वैचारिक प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे प्रदूषण दूर करण्याचे साधन धार्मिक केंद्र आहे. चांगल्या विचारांबरोबर आचरणसुध्दा महत्त्वाचे आहे. भौतिक संपदेच्या प्राप्तीतून समाधान झाले असते तर स्वैराचार झाला नसता. देशातील धार्मिक संस्था सदैव सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात.
पुस्तकांमध्ये विश्वात्मक तत्त्वाचे स्वरूप मांडले आहे. स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. ज्ञान-विज्ञानाच्या यज्ञातून विश्वशांतीची ज्योत पेटवायची आहे. त्यासाठी त्याग आणि समर्पण हे महत्वाचे असल्याचे डॉ. कराड म्हणाले. श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे ११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश गोविंददेव गिरीजी यांना देण्यात आला.
चौकट
मुस्लिम संघटनेचे ‘पैसे’ परत
ऑल इंडिया मुस्लिम इंटेलेक्चुअल फोरमतर्फे राममंदिरासाठी सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावर गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, यापूर्वी अनेक मुस्लिम संघटनांकडून राममंदिरासाठी देणगी म्हणून मी धनादेश स्वीकारले आहेत. रोख रकमेचा हिशेब ठेवण्यास अडचण येते. त्यामुळे ही रक्कम मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडे सुपूर्द करतो. देणगीसाठी धनादेश द्यावा, अशी विनंती त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम इंटेलेक्चुअल फोरमला केली.