भोर - पंतसचिव राजवाड्यात (Pantsachiv rajwada) रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा म्हणजेच रामनवमी उत्साहात (Celebration) पार पडला.
सकाळी 11च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला. यावेळी रंगबेरंगी पडद्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नववारी साड्या असे पोशाख परिधान केले होते.
लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रामजन्म सोहळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतिंच्या हस्ते श्रीरामनवमीच्या उत्सवातील धार्मिक व लौकिक कार्यक्रमास सुरूवात होते. या राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षापेक्षा जास्तची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तर त्यापैकी सध्या ऐतिहासिक राजवड्यात 150 वर्ष सोहळा साजरा होतो