पुणे : राम नदीमध्ये बावधन बुद्रुक परिसरात प्रदूषण केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे. याविषयी राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये पीएमआरडीए आणि महापालिका यांनी समिती स्थापन करून प्रदूषणावर उपाय करावेत, असे निर्देश दिले आहेत. या प्रदूषित नदीमुळे पाषाण तलावातील पाणी पिण्यालायक राहिले नाही, त्यामुळे बावधनमध्ये टँकरवर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.
या विषयी नदीप्रेमी व आपचे स्वयंसेवक कृणाल घारे यांनी ‘एनजीटी’मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. पुढील सुनावणी आता ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. तोपर्यंत पीएमआरडीए आणि महापालिका यांना समिती स्थापन करून राम नदीची पाहणी करायला सांगितली आहे. तसेच त्यांनी उपाययोजना काय केल्या, त्याचा अहवाल देखील पुढील सुनावणीला सादर करावा, असे निर्देश एनजीटीने दिले आहेत.
कृणाल घारे म्हणाले,‘‘मी राम नदीमध्ये दोन ठिकाणी सांडपाणी जात असल्याचे पाहिले. त्याचे फोटो काढून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. परंतु, त्यांनी त्यावर काहीच केले नाही. मग एनजीटीमध्ये तक्रार दाखल केली. तेव्हा सुनावणीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि पालिका दोघांनाही समिती स्थापन करून पाहणी करायला सांगितले आहे. सध्या एका ठिकाणी पालिकेने पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, राम नदी १९ किलोमीटरची आहे. त्यातील अर्धा भाग हा पालिका हद्दीत येतो आणि अर्धा भाग पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. संपूर्ण नदीत होणारे प्रदूषण कमी करावे, अशी आमची मागणी आहे.’’
तर बावधनचे टँकर होतील बंद
‘‘राम नदी खाटपेवाडी येथून उगम पावते. तिथून ती मानस लेकच्या पुढे बावधनमध्ये येऊन पाषाण तलावाला मिळते. पूर्वी बावधनमधील लोकं पाषाण तलावेचे पाणी पित असत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये पाणी पिण्यालायक राहिले नाही. त्यामुळे बावधन परिसरात टँकरवर तहान भागवावी लागत आहे. खरंतर पाषाण तलावाचे १.५ टीएमसी पाणी हे पिण्यासाठी वापरता येऊ शकते. पण राम नदी प्रदूषित असल्याने ते वापरता येत नाही. अनेक ठिकाणी ड्रेनेज फुटलेले आहेत. ते दुरूस्त करून जर राम नदी प्रदूषित केली नाही, तर लोकांना पाषाण लेकचे पाणी वापरता येईल,’’ असे घारे यांनी सांगितले.