पुणे : इस्लाम धर्मीयातील पवित्र रमजान महिन्यास १४ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. उद्यापासूनच महिनाभर चालणा-या रमजान रोजे (उपवास) सुरुवात होत आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही रमजानच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे.
मुस्लीम धर्मीयातील सर्वांत पवित्र समजल्या जाणा-या रमजान महिन्याच्या अखेरीस ३० दिवसांच्या उपवासानंतर रमजान इद साजरी होते. या महिन्यात पहाटे सहेरी केल्यानंतर दिवसभर उपवास (अन्न, पाणीही घेतले जात नाही) केला जातो. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्तानंतर इफ्तारी (रोजा सोडणे) होते. या दरम्यान दिवसभर नमाजपठण. कुराणपठण केले जाते. पहाटेपासून दिवसभर पाचवेळा नमाज अदा केली जाते. चंद्रदर्शनानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होइल व महिनाभराने वर्षातील सर्वात मोठी इदही चंद्रदर्शनानंतर साजरी होते.
यंदाही कोरोनामुळे सामूहिक नमाजपठणावर निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांना घरीच नमाजपठण करावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच बाजारपेठ गेल्या काही दिवस बंद आहेत. त्यामुळे रोजा सहेरी व इफ्तारीसाठी आवश्यक असलेल्या खजूर, खारीक, शेवया, सुकामेवा तसेच फळे, दूध यांना यंदा जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सायंकाळी काही ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली होती.