इंडोनेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात ‘रमजान’च्या महिन्यात वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, गरजूंना समुपदेशन व मानसिक आधार देणे हे शक्य होत असेल; तर मग आपल्या देशात का होऊ नये? असा सवाल इस्लाम धर्माचे अभ्यासक अस्लम जमादार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उपस्थित केला. तसेच आपल्या शेजारील कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती भुकेली राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येक मुस्लिम बांधव त्याच्या मदतीसाठी सरसावेल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘रमजान’ साजरा होईल, असे त्यांनी नमूद केले.मुस्लिमांच्या पवित्र ‘रमजान’ महिन्याला रविवारी सुरुवात झाली आहे. रमजान म्हणजे उपासना, कृतज्ञता, आनंद आणि आभार प्रदर्शनाचाच महिना म्हणून गणला जातो, असे नमूद करून जमादार म्हणाले, इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शुद्धता, समर्पण व आज्ञापालन असा आहे. इस्लाम म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण व ईश्वराची आज्ञापालन होय. जो कोणी जीवनाच्या प्रत्येक पैलूचे इस्लामच्या शिकवणुकीनुसार पालन करील तोच खरा ‘मुस्लिम’ आहे.जमादार म्हणाले, ‘रमजान’ महिन्यात पवित्र ग्रंथ कुराण उतरविण्याचे व आदेशांना ग्रथित करण्याचे काम झाले आहे. म्हणूनच या महिन्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. तसेच ईश्वराचे नामस्मरण करावे आणि उपवास (रोजा) संपूर्ण महिनाभर करण्यात मुस्लिम बांधव तल्लीन होऊन जातात.रोजा म्हणजे केवळ उपाशी राहून चालत नाही. या संबंधी प्रेषित मुहम्मद पैगंबर (स.) यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायांचा रोजा, कानाचा रोजा आहे. रोजा ठेवणाऱ्या डोळ्यांनी वाईट पाहू नये. हाताने वाईट काही करू नये, त्याची पाऊले वाईट मार्गाकडे वळू नयेत, कानांनी वाईट काही ऐकू नये. कोणाशी भांडू नये. कोणी भांडायला आल्यास त्यांना नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. या एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणाऱ्या व्यक्तीस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते, की समाजासाठी ती व्यक्ती उपयोगी होऊन जाते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तीची निर्मिती व्हावी, त्यातून एक आदर्श समाजाची रचना होईल; हाच त्यामागील उद्देश दिसून येतो. परंतु, दुर्दैवाने असभ्यतेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. खोटेपणा, विश्वासघात, फसवणूक ही मोठ्या स्तरावर पोहोचू लागली आहे. अहंकार, लोभीपणा, स्वार्थ, यांनी थैमान मांडले आहे.मुस्लिम समाजातील व्यक्तीने सत्य, चांगुलपणाची नीतिमूल्ये आचरणात आणताना कुराणचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे.‘रमजान’ म्हणजे भल्या पहाटे उठणे, जेवणे, इफ्तार पार्टीच्या माध्यमातून अन्नपदार्थ खाणे असे बहुतेकांचे समीकरण होऊ लागले आहे. मुस्लिम समाजातील धार्मिक संस्थेतील, मदरसे, मशिदीमधून मुल्ला-मौलवी सातत्याने आपल्या प्रवचनाताून प्रबोधन करत असले तरी शेजारील गरीब, गरजू निराधार पीडितांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक, मानसिक मदत करण्यात मोठे यश मिळालेले नाही.‘जकात’ ही संकल्पना खरे तर गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी दूर करण्यासाठी निर्मित केली गेली, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजातील विचारवंत, अभ्यासक, धार्मिक नेत्यांनी एकत्र येऊन ही सकंल्पना युवा पिढीला हाताशी घेऊन कार्यान्वित केली तर आर्थिक मदतच नव्हे तर रोजगारसुद्धा उपलब्ध होऊ शकेल. काही मशिदींच्या समोर बुरखेधारी घटस्फोटित, विधवा महिला आपल्या लेकरांना बरोबर घेऊन मदतीच्या अपेक्षेने उभ्या असतात. ही स्थिती बदलून या महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहण्याची गरज आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.‘ईद’च्या दिवशी व संपूर्ण रमजान महिन्यात इतर जातीधर्मातील किमान पाच व्यक्तींशी मैत्रीनाते संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी स्नेह प्रस्थापित करणे हाच अलीकडील काळातील ‘रमजान’चा संदेश आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘रमजान’मध्ये गरजूंचा आधार व्हावे
By admin | Published: May 29, 2017 1:37 AM