पुणे : देशातील पहिल्याच मातोश्री रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.३०) सकाळी १०.४५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यावेळी उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात रमामाई यांचा तब्बल साडे नऊ फुट उंचीचा गनमेटल पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याला महाराष्ट्र कला संचालनालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमामाई यांनी खबीरपणे साथ दिली. त्यांनी निष्ठेने, त्यागाने व कष्टाने संसाराचा गाडा हाकून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. हा पुतळा उभारण्यासाठी या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी स्वर्गीय नवनाथ कांबळे, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, लता राजगुरू, हिमाली कांबळे, लता धायरकर, मंगला मंत्री या नगरसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
रमामार्ईच्या पुतळ्याचे बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 8:26 PM
वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात रमामाई यांचा तब्बल साडे नऊ फुट उंचीचा गनमेटल पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
ठळक मुद्देमुक्ता टिळक : रमामाईचा देशातील पहिलाच पुतळा