पुणे : सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलेच अधिवेशन हे वादळी ठरणार याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं होत. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं होत. यावरच पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा समाचार घेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के , आम्ही आहोत पक्के असं ते यावेळी म्हणाले आहेत.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधकांचा समाचार घेतला.
आठवले म्हणाले, पालिका निवडणूक लवकर व्हाव्या हीच आमची इच्छा आहे. मात्र आधीच्या सरकारनं प्रभाग बदलले त्यांनी घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या आहेत. आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करतंय. डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका होतील. ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के. तुम्ही काही पण करा आमचं सरकार पडणार नाही. पुन्हा आम्हीच निवडून येवू. आम्हाला बदनाम करू नका. आधी शिवसेना आमच्यासोबत, भाजप सोबत होती. मधल्या काळात ती दूर गेली. आता खरी शिवसेना आमच्या सोबत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.