लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कॉंग्रेसने गुरुवारी (दि.२६) संघटनात्मक पदांची घोषणा केली. राज्यभरात ६५ सरचिटणीस, १०४ चिटणीस आणि १८ उपाध्यक्षांसह काही शहराध्यक्षपदे जाहीर करण्यात आले. यात पुण्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यावरचा विश्वास पक्षाने कायम राखला आहे. बागवे यांना बदलण्याची मागणी शहरातून होत होती. मात्र त्याची दखल पक्षाने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातून उल्हास पवार आणि अनंत गाडगीळ यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष असलेल्या शिस्तपालन समितीमध्ये पवार यांना स्थान देण्यात आले आहे. गाडगीळ यांच्याकडे अन्य पाच जणांसह प्रवक्तेपद सोपवण्यात आले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पक्ष संघटनेत बदल करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. बागवे यांच्याऐवजी अन्य कोणाकडे शहराची सूत्रे सोपवावीत, असा आग्रह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केला होता. मात्र ‘अन्य कोण?’ यावर कॉंग्रेसमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे बागवे यांचे पद कायम राहिले असे सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत शहर कॉंग्रेसची सूत्रे बागवे यांच्याकडेच राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. बागवे यांच्याबद्दल असणारी अनेकांची व्यक्तिगत नाराजी दूर करून पक्षाला एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान बागवे यांच्यापुढे असेल. राज्याच्या सत्तेत असणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात मजबूत आहे. आगामी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासोबत लढवण्याचे ठरले तर कॉंग्रेसच्या वाट्याला जास्तीत जास्त जागा खेचून आणण्याचे आव्हान बागवे यांच्यापुढे असेल. बागवे यांच्या नेतृत्त्वात सन २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची शहरातली कामगिरी निराशाजनक झालेली आहे. मात्र आता राज्याच्या सत्तेत असल्याचा फायदा घेत हे चित्र पालटवण्याची कामगिरी बागवे यांना करून दाखवावी लागेल. तरच पक्षश्रेष्ठींनी टाकलेल्या विश्वासास ते पात्र ठरू शकतील, असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.