लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई स्मृती बारा वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत देशभरातून अडीचशेहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे ६ ते १३ मार्च या कालावधीत रंगणार आहे.
एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, पहिल्या फेरीपासून खेळाडूंना एकूण तीन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एआयटीएचे सचिव आणि माजी एमएसएलटीएचे मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून कुमार पातळीवर टेनिसच्या प्रसारासाठी नक्कीच मदत होईल.
स्पर्धेत बारा वर्षांखालील मुलांच्या गटातील मुख्य फेरीचा ड्रॉ चौसष्टचा असून मुलींच्या गटातील मुख्य फेरीचा ड्रॉ अठ्ठेचाळीसचा असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने ६ व ७ मार्चला होणार असून मुख्य फेरीस सोमवारी (दि.८) होणार आहे. स्पर्धेचे संचालक मनोज वैद्य असून स्पर्धा निरीक्षक म्हणून वैशाली शेकटकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, सोनल वैद्य यांनी मुख्य रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.