NCP Sharad Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्रात मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्यांचं आयोजन केलं जात आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे यांनीही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर 'जवाब दो' आंदोलन करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर आज रमेश केरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत पवार यांची काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं, अशी मागणी या आंदोलकांनी केली. त्यानंतर पवार यांनी या आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं.
रमेश केरे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर साधारण ११ वाजताच्या सुमारास हे आंदोलक शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पवार यांनी आंदोलकांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर शरद पवार हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
कोण आहे रमेश केरे?
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करणाऱ्या रमेश केरे यांच्यावर ते भाजपशी संबंधित असल्याचा आरोप झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काळात त्यांनी आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोपही त्यांच्यावर अनेकदा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे केरे पाटील यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईत आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. केरे यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये उंदीर मारण्याचे औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी केरे पाटील यांचा जबाब नोंदवून घेत विवेकानंद बाबर, अनिरुद्ध शेलार, योगेश केदार, संदीप पोळ, बाळासाहेब सराटे, विशाल पवार, नितीन कदम, प्रदीप कणसे यांसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय होतं?रमेश केरे यांच्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आर्थिक व्यवहार झाले आणि आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न झाला, अशा प्रकारचे संभाषण त्यात होते.