पुणे : ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’ म्हणत साजरा होणारा रामजन्म सोहळा यंदा भाविकांना अनुभवता येणार नाही. कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सलग दुसऱ्या बुधवारी (२१ एप्रिल) मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणे टाळावे, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केले आहेत.
शहरातील सर्वांत जुन्या मंदिरांपैकी तुळशीबागेतील राम मंदिर अडीचशे वर्षे जुने आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून राम नवमीनिमित्त मंदिरामध्ये राम नवमीचा उत्सव साजरा केला जातो. रामजन्मापूर्वी रामाला परिधान करण्यात येणाऱ्या पोषाखाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मुख्य पूजा आणि रामजन्म सोहळा झाल्यावर रामाच्या वस्त्राचा लाल रंगाचा तागा भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. करोना प्रादुर्भावामुळे रामनवमीचा उत्सव यंदा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. मंदिराचे पदाधिकारी अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा होणार आहे, असे श्री रामजी संस्थानचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी सांगितले.
पुण्यातील अन्य राम मंदिरांमध्येही रामनवमीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. एकत्र येणे शक्य नसल्याने काही धार्मिक संस्थांनी ऑनलाइन कीर्तन आणि प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
...........................................