इंदापूर – तालुक्यातील भांडगाव इथं झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर रामोशी समाज आक्रमक झाला आहे. याठिकाणी समाजाच्या वतीने इंदापूर तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत, आमच्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे, भांडगाव बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला.
३० तारखेला भांडगाव इथं एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो आणि ३७६ चा गुन्हा दाखल केला. पण अशा घटना कुठल्याही समाजाच्या मुलीवर होऊ नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असं आंदोलकांनी म्हटलं. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून, आरोपीला कुठलीही मुभा न देता फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालावा. आरोपीला जन्मठेप व्हावी अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली.
याच मागणीसोबत इंदापूर तालुक्यात रामोशी समाजचे जवळपास १२ हजार मतदान आहेत आणि १८ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. रामोशी वतनावर काही गावगुंडांनी ताबा मिळवला आहे. काही ठिकाणी रामोशी समाजाला जमीन आहे परंतु जायला रस्ता नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल केले जात नाही यासारख्या विविध मागण्यांसाठी रामोशी समाजाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.