बारामती : बारामती नगरपरीषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या येथील घराला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी(दि १२) सकाळी घडली. यामध्ये गुजर यांच्या घराचा दुसरा मजला पुर्ण जळुन खाक झाला आहे. सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामध्ये गुजर यांनी जतन केलेला १०० वर्षांपुर्वीचा सहित्य आणि संगीत सहित्याचा अनमोल ठेवा जळुन खाक झाला आहे. बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
आग लागली त्यावेळी घरामध्ये किरण गुजर यांच्या पत्नी व त्यांचा पुतण्या हे उपस्थित होते. मात्र धूर यायला लागल्यामुळे ते घरातून तातडीने बाहेर पडले. गुजर हे नेहमीप्रमाणे नटराज नाट्य कला मंडळात थांबलेले असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत बारामती अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना संगीत आणि सहित्य जतन करण्याचा छंद आहे. याच छंदामुळे गुजर यांनी ग्रामोफोन तसेच त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे २५० पेक्षा जास्त खापराच्या जुन्या ‘रेकॉर्ड’,टेपरेकॉर्डर सह २००० पेक्षा जास्त कॅसेट,सीडी प्लेअरसह २५० सीडी जपुन ठेवल्या होत्या. तसेच यात २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश होता. विशेष या सर्व संग्रहामध्ये ब्रिटीशकाळापासुनच्या संगीत आणि सहित्याचा समावेश होता. तो सर्व ऐवज जळुन खाक झाल्याची खंत गुजर यांनी व्यक्त केली. तसेच या आगीमध्ये संपूर्ण फर्निचर, कपडे आणि इतर साहित्य जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या मजल्यावर कोणीही नव्हते. याआगी मध्ये किमान ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.