पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर होणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मोठं आंदोलन उभारले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर विद्यापीठाने शुक्रवारी( दि. १३) रानडेतील एकत्रित केलेल्या दोन्ही विभागांचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे सुरू राहतील असे परिपत्रक काढत रानडे इन्स्टिटयूटच्या स्थलांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. पण आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिटयूटच्या स्थलांतराचा निर्णय रद्द केला असल्याची घोषणा केली आहे.
पुण्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिट्यूट स्टाफ, विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू, आजी-माजी विद्यार्थी संघटना, पत्रकार संघटना, पत्रकार संघ अध्यक्ष आणि सदस्य यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सामंत म्हणाले, स्थगिती शब्द काढावा अशी अनेकांची मागणी होती. हा सगळा अॅकडमिक कमिटीचा वाद होता. जे कोर्सेस स्थलांतरित करण्यात येणार होते ते 'रद्द' करण्यात आले आहेत. विभागाच्या शैक्षणिक आणि भौगोलिक विकासासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात येईल. ही समिती अहवाल शासनाला देईल. ही समिती जागेचा प्रश्न सोडवेन. ९० दिवसात शासनाला अहवाल सादर करतील.या जागेचा वापर कर्मशिअल गोष्टीसाठी नव्हे तर शैक्षणिक गोष्टीसाठी उपयोग राहील असं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे.
रानडे इन्स्टिट्यूट पुण्यापुरतं मर्यादित नाही, हा देशभराचा ठेवा आहे. प्राध्यापक भरती होणार नाही हा गैरसमज आहे. शासनाकडून हा मुद्दा सोडवला जाईल. युवासेनेने मागणी केली, कौतुक आहे पण त्यांनी मागणी केली म्हणून मी इथे आलेलो नाही. विविध विद्यार्थी संघटना आणि पत्रकार संघटनांनी मागणी केली होती म्हणून मी इथे आलेलो आहे. इथे अॅकडमिक सोयी व्हाव्यात असाही आमचा प्रयत्न आहे असं बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती सामंत यांनी सांगितले.
पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबद्दल माध्यमातून उलटसुलट बातम्या येत आहेत. त्या वस्तूस्थितीला धरून नाही. याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी वेळोवेळी भूमिका जाहीर केली आहे.
रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पूर्वीप्रमाणे पदविका अभ्यासक्रम (प्रवेश क्षमता १२०) सुरू राहील. त्यासोबत नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर करिअर ओरियंटेड पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील ई. एम. एम. आर. सी व विद्यावाणी या संस्थांशी प्रशिक्षणासाठी जोडण्यात यावे. एम.सी.जे (प्रवेश क्षमता ३६) हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या मुख्य आवारात स्थलांतरीत करून त्यास स्टुडिओसहित सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. एकत्रित केलेल्या दोन्ही विभागांचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, असे विद्यापीठाच्या माध्यम समन्वय कक्षाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.
कॉलेज सुरू करण्याबाबतआमची तयारी रानडेच्या स्थलांतराचा विषय रद्द झालेला आहे. स्टुडिओसह भौतिक सोयी सर्व परवानग्या घेऊन उपलब्ध करून दिल्या जातील. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कॉलेज सुरू करण्याबाबत आमची तयारी आहे. मात्र, किती टक्क्यात सुरू होईल हे बघावं लागेल. मात्र त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही सामंत म्हणाले.