पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, तब्बल २५ हजार ७४० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज केला आहे. मात्र, रानडे इन्स्टिट्यूटसह इतर महाविद्यालयांतून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी निवेदने देऊनही त्याची दखल विद्यापीठ प्रशासनाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे आम्ही पीएच.डी.च्या माध्यमातून संशोधन केव्हा करायचे, असा सवाल पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये विलीन करून काही अभ्यासक्रम स्थलांतरित करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला होता. मात्र, त्यास सर्वच क्षेत्राकडून विरोध झाला. त्याचप्रमाणे स्वत: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा यात लक्ष दिल्याने विद्यापीठाला रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा निर्णय रद्द करण्यात आला. परंतु, या विभागातून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पत्रकारितेत संशोधन करण्याची इच्छा आहे. मात्र, विद्यापीठाकडून या विषयासाठी अर्जच मागविले जात नाहीत.
पत्रकारितेत यापूर्वी पीएच.डी. केलेले काही प्राध्यापक मार्गदर्शक (गाईड) होण्यास पात्र आहेत. मात्र, विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून मार्गदर्शक म्हणून नोंदणी करण्यासाठी या प्राध्यापकांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या प्राध्यापकांनीसुद्धा विद्यापीठाकडे लेखी निवेदने दिली. परंतु, त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशाची संधीच उपलब्ध होत नाही. यंदाही विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे रानडेचे विद्यार्थी पुन्हा एकदा पीएच.डी. प्रवेशापासून उपेक्षित राहिले आहेत.
------------------------------------