पिंपरी : महापालिका क्षेत्रातील रिक्षाचालकांना सीएनजी किंवा एलपीजी गॅसचे किट बसविण्यासाठी महापालिकेतर्फे १२ हजार रुपये अनुदान देण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने सोमवारी मंजुरी दिली. हे अनुदान पर्यावरण विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे.हवा प्रदूषण कमी करण्यासाठी रिक्षांना सीएनजी किंवा एलपीजी गॅस किट बसविण्यासाठी महापालिका अनुदान देते. शहरात ५८०० आॅटो रिक्षा आहेत. पुणे महापालिकेच्या धर्तीवर सीएनजी अनुदान द्यावे, अशी मागणी रिक्षा पंचायत, क्रांती रिक्षा सेना आदी संघटनांनी केली होती. स्थायी समितीने याबाबतचा ठरावही मंजूर केला होता. ज्या रिक्षाचालकांनी जुन्या व नव्या रिक्षांना सीएनजी किट बसविले आहे. त्यांना अनुदान द्यावे, यासाठी अर्थसंकल्पात पर्यावरण विभागाने एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली. त्यानुसार दहा हजार रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता. दरम्यानच्या कालखंडात काही रिक्षा संघटनांनी वाढीव अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार उपसूचना देऊन १२ हजार अनुदान देण्याचा विषय मंजूर केला. (प्रतिनिधी)
सीएनजी किटसाठी रिक्षांना अनुदान मिळणार
By admin | Published: April 07, 2015 5:39 AM