लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासारख्या सांस्कृतिक माहेरघरात तरूण रंगकर्मींच्या
कलागुणांना वाव देणा-या पुरूषोत्तम, फिरोदिया करंडक किंवा राज्य नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांसह अकरा वर्षांपासून ‘रंग संगीत महोत्सव’ ही स्पर्धा देखील रंगकर्मींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. याच महोत्सवात साकार झालेली ‘संगीत देवबाभळी’ सारखी एकांकिका नंतर नाटक स्वरूपात आकाराला आली, हे या महोत्सवाचे वेगळेपण! रंगकर्मींना नवी ऊर्जा देणारा हा ‘रंगसंगीत महोत्सव’ येत्या मार्चमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक आणि अंतिम फेरी पुण्यामध्ये पार पडणार आहे.
संगीत नाटकांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशातून थिएटर अॅकॅडमीतर्फे या रंगसंगीत महोत्सवाची पुण्यात मुहूर्तमेढ रोवण्यात आली. संगीत एकांकिका आणि गद्य एकांकिका अशा दोन गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत यंदापासून महाविद्याालयीन गट वेगळा केला आहे. मुकुंदनगर येथील ‘सकळ ललित कलाघर’ या थिएटर अॅकॅडमीच्या नाटयसंकुलामध्ये दि. २० ते २२ मार्च या कालावधीत रंगसंगीत महोत्सवाची प्राथमिक फेरी, तर २८ मार्च रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार असल्याची माहिती थिएटर अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी ’लोकमत’ ला दिली.
कोव्हिड काळात खबरदारीच्या उपायोजना म्हणून एकांकिका सादर होताना प्रेक्षकांना सभागृहात सोडण्यात येणार नाही. मात्र, रंगमंचावरील कलाविष्कार ऑनलाइन स्वरूपात दाखविण्याबाबत संयोजक विचार करीत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत पाच संगीत एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर नाटक स्वरूपात सादर झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.