ओझर : ती २०११ साली ट्रेनिंग पूर्ण करुन पोलीस दलात दाखल झाली. खून,बलात्कार अशा तब्बल अकरा गंभीर गुन्ह्यांचा छडा तिने लावला..त्यातील नराधमांना शिक्षेपर्यंत पोहचवलं.. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला ४ वेळा पदक देवून सन्मानित करण्यात आले. शिस्तप्रिय आणि २४ तास तपासकार्यासाठी तत्पर असलेली ती निवृत्ती घेतेय म्हटल्यावर तिचे सहकारी प्रचंड हळवे झाले..जसे एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला निरोप देताना होतात ना अगदी तसे.. राणी... होय राणी तिचं नाव.. पण राणीच्या निवृत्तीविषयी हळवेपणात छुपी काळजी सुध्दा दडलेली होती. पण त्यांनी तिला स्वत: च़्या कुटुंब सदस्याप्रमाणे सांभाळ करण्याचे वचन देत उतारवयात हक्काचे घर उपलब्ध करुन दिले. जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेत (एल सी बी) गेली १० वर्षे महत्वाची भूमिका बजावणा-या राणीलातिचे हॅन्डलर (श्वान प्रशिक्षक) गणेश फापाळे हे तिचा कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे त्यांच्या घरी सांभाळ करणार आहेत. लेब्रॉडर जातीच्या राणीने शिवाजीनगर येथील डॉग ट्रेंनिग सेंटर मधून ट्रेंनिग पूर्ण करुण २०११मधे पोलीस दलात बॉम्बनाशक पथकात दाखल झाली. पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना तिने ११ गंभीर गुह्यातील आरोपींचा शोध लावला. या आरोपींना शिक्षा देखील झाली आहे. राणीने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत तिला ४ वेळा मेडल देवून सन्मानित करण्यात आले आहे. शिस्तप्रिय व न थकता जिल्ह्यातील वेगवेगळ्या तपासकामी २४ तासात कधीही बोलावणे आल्यावर आपले कर्तव्य चोख बजावन्याची छाप पोलीस दलात तिने सोडली आहे. तिचे हँन्डलर गणेश फापाळे म्हणाले, राणी मुका प्राणी असूनही पोलीस खात्यातील शिस्त तत्काळ अंगीकारली होती. जेजुरी राजेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला राणीने मृतदेहाजवळ आढळलेल्या छोट्या ब्लेडच्या वासावरून पकडले. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. दुस-या घटनेत तक्रारवाडीतील अल्पवईन मुलीचा मृतदेह पोत्यात आढळला होता. पोत्याच्या वासारून राणीने आरोपिचे घर दखविले. नंतर त्या आरोपीला शिक्षा झाली होती. राणीच्या पोलीस दलातील विशेष कामगिरीबाबत राज्याचे गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटिल यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...............................राणी सेवेत असताना जिल्ह्यातील विविध ठिकाणी दररोज दोन ते तीन ठिकाणी तपाससकामी जावे लागायचे परंतु तिने कर्तव्यात कधी कसर केली नाही. पोलीस खात्यात माझ्यावर श्वान हॅन्डलर म्हणून पडलेली जबाबदारी मला नविनच होती व राणी देखील नवीन. परंतु, दहा वर्षात आम्ही मिळून मिसळून विविध गुन्हे उजेडात आणले. तिचा खाण्या पिण्यावर महिन्याचा चार ते साडेचार हजार रुपये खर्च आहे. निवृत्तीनंतर ती आमच्या घरात कुटुंबातील सदस्य म्हणून वावरत आहे. लहान मुलांबरोबर ती मिसळून गेली आहे. तिचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कुटुंबातील घटकाप्रमाणे सांभाळ करणार आहोत. गणेश फापाळे, राणीचे हॅन्डलर ---११ गंभीर गुन्ह्यांचा राणीने लावला छडा तळेगांव दाभाडे रेल्वे स्थानकावर बॅगेत महिलेचा मृतदेह सापडला होता. बॅगेच्या वासावरून तिने तब्बल तीन किलो मीटर दुर असलेल्या आरोपीचा छडा लावला होता. या बरोबरच शेलपिंपळगाव (ता.खेड) येथील उसतोड महिलेचा खून, रांजणगाव (ता.शिरूर) येथील महिलेचे खून प्रकरण, जेजुरी व भिगवन येथील अल्पवईन मुलीवर बलात्कार व खून प्रकरण, भांबूर्डे (ता .बारामती) येथील चिंकारा शिकार प्रकरण, दौंड तालुक्यातील दारोड्यातील अट्टल गुन्हेगारांचा शोध, आव्हटवाडी (ता.खेड) येथील खून प्रकरण, शिरूर शहरातील स्टेट बँक एटीम दरोडा अश्या विविध गंभीर गुह्यातील आरोपींना राणीने आरोपीच्या पिंज-यात उभे केले.
अकरा गंभीर गुन्हयांचा छडा लावणाऱ्या ‘राणी’ ला उतारवयात मिळाले हक्काचे घर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 7:06 PM
ती निवृत्ती घेतेय म्हटल्यावर तिचे सहकारी प्रचंड हळवे झाले..जसे एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला निरोप देताना होतात ना अगदी तसे..
ठळक मुद्देजिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेत गेली १० वर्षे महत्वाची भूमिका लेब्रॉडर जातीच्या राणीने शिवाजीनगर येथील डॉग ट्रेंनिग सेंटर मधून ट्रेंनिग पूर्णपोलीस दलात कर्तव्य बजावत असताना तिने ११ गंभीर गुह्यातील अरोपींचा शोध