पुणे : बारामती मतदार संघामध्ये यंदा माेठी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमन खासदार सुप्रिया सुळे यांच्या विराेधात भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला तर परवा कांचन कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज कांचन कुल यांच्या सासू आणि राहुल कुल यांच्या आई माजी आमदार रंजना कुल यांनी आज बारामतीतून डमी अर्ज दाखल केला आहे.
कांचन कुल या पहिल्यांदाच बारामतीतून लाेकसभेची निवडणुक लढवत आहेत. रासपचे दाैंडचे आमदार राहुल कुल यांच्या त्या पत्नी आहेत. कुल यांचं माहेर बारामती आहे. त्यांचा आणि राहुल कुल यांच्या विवाहासाठी सुनेत्रा पवार यांनी मध्यस्ती केली हाेती. सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. परवाच त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. दरम्यान कांचन कुल यांच्या अर्जात काही त्रुटी आढळल्यास आणि ताे अर्ज बाद झाल्यास दुसरा उमेदवार काेण असा प्रश्न निर्माण हाेऊ नये म्हणून कुल यांच्या सासू रंजना कुल यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तर रंजना कुल यांना भाजपाच्या तिकीटावरुन निवडणुक लढवता येणार आहे.