लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील डॉक्टरांना लक्ष्य करून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या व गेल्या १० महिन्यांपासून फरारी असलेल्या सराईत खंडणीबहाद्दर महिलेसह तिच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने फलटण येथून अटक केली.
रंजना तानाजी वणवे (वय ३८) आणि तिचा साथीदार सागर दत्तात्रय राऊत (वय २४) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हडपसर परिसरातील डॉक्टराला धमकावून त्याच्याकडून खंडणी उकळणाऱ्या रंजना वणवे व तिच्या साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तिच्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई केली होती. तेव्हापासून ती फरार होती.
रंजना वणवे ही फलटण येथे लपून बसली असल्याची माहिती युनिट ५ चे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांना मिळाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, कर्मचारी महेश वाघमारे, विनोद शिवले, स्वाती गावडे यांनी वणवे व सागर राऊत यांना अटक केली.
रंजना वणवे हिच्यावर शहर आणि ग्रामीण भागात फसवणुकीचे आणि खंडणीचे गुन्हे दाखल होते. तिने खंडणी उकळण्यासाठी एक टोळी बनवली होती. त्या आधारे तिची टोळी वेगवेगळ्या भागातील प्रतिष्ठीत डॉक्टरांना लक्ष्य करून त्यांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचे काम करीत. तिच्यावर यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथील बार्शी पोलिस ठाण्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. त्या मोक्काच्या गुन्ह्यात ती जामिनावर बाहेर आली होती. परंतु, जामिनावर सुटल्यानंतरही वणवेने डॉक्टरांना पुन्हा ब्लॅकमेल करुन खंडणी उकळण्यास सुरूवात केली होती. गेल्या १० महिन्यांपासून ती पोलिसांना गुंगारा देत होती. निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक शेंडगे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही पकडले.