रांजणगाव गणपती : येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपती मंदिरातील सुरक्षा मॉकड्रीलनंतर कडक करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कसून तपासणी करण्यात येत आहे. चाचणीत आढळलेल्या त्रुटींनंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी येथे लक्ष घातले आहे. सुरक्षेचा भाग म्हणून या तपासण्या करण्यात येत असून, भाविकानी भीती न बाळगता गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अंकु श लवांडे, मुख्यविश्वस्त अॅड. मकरंद देव व उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. सध्या नाताळच्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून, सुरक्षेबाबत भाविकांची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी विश्वस्त मंडळाने ही पत्रकार परिषद घेतली. दहशदवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाची शहरे व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दहशदवादविरोधी पथकाकडून रांजणगाव गणपती मंदिरात बॉम्बसदृश वस्तू ठेवून मॉकड्रील करण्यात आले होते. त्यात सुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी आढळल्या होत्या. देवस्थानकडे सध्या सुरक्षेच्या दृष्टीने ३ डोअर मेटल डिटेक्टर, ३ हॅण्ड डिटेक्टर, ३८ सीसीटीव्ही कॅमेरे, १० वॉकीटॉकी यंत्र, ६ फायर एक्स्टीग्युंर, १ अलार्म सिस्टिम कार्यान्वित आहे. एकूण ४० सुरक्षारक्षक, ४ बंदूकधारी सुरक्षारक्षक, २ बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहे. एकाच प्रवेशद्वारातून कडक तपासणी करण्यात येत असून, देवस्थानची सुरक्षा यंत्रणा भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे. साध्या वेषातील सुरक्षारक्षक व पोलीस मंदिर व परिसरात बारकाईने नजर ठेवून आहेत. प्रत्येक नागरिकाने व भाविकांनीही सजग राहून कुठेही काही संशयित वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केले आहे. (वार्ताहर)
रांजणगावला सुरक्षा कडक
By admin | Published: December 25, 2014 11:20 PM