रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी गेल्या दोन महिन्यांपासून संपले असून, यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ग्रामस्थांना पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.चासकमानच्या डाव्या कालव्यातून कोंढापुरी तलावात सात दिवसांच्या आत पाणी सोडावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने महिलांच्या उपस्थितीत पुणे-नगर हायवेवर रास्ता रोकोचा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी मानसिंग पाचुंदकर, माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर, परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.रांजणगावची स्थायी व अस्थायी मिळून मोठी लोकस्ांख्या असल्याने पाणी प्रश्न बिकट बनला आहे. सद्यस्थितीत तलावातील पाण्याने तळ गाठल्याने २० कोटी रुपये खर्चाची रांजणगावची पाणीपुरवठा योजना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. कोंढापुरी, रांजणगाव परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी सावरला नाही. रांजणगाव गणपतीसह परिसरातील गणेगाव, वरुडे, पिंपरी दुमाला, वाघाळे, बुरुंजवाडी, मोराची चिंचोली, खंडाळे या ७ ते ८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोंढापुरी तलावावर अवलंबून आहे. हा तलाव पाण्याअभावी अजूनही कोरडाठाक पडला आहे. आजही रांजणगावसह परिसरातील या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चासकमानमधून पाणी सोडताना प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे अपेक्षित असताना पाणी सध्या चासकमानमधून शिरूरसाठी थेट टेल पाणी सोडण्यात आले आहे. पाणी शेतीसाठी सोडल्याने रांजणगावसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधांतरी राहिल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.
रांजणगावची पाणी योजना आजही ठप्प
By admin | Published: July 29, 2016 3:47 AM