रांजणगाव गणपती : येथील राजेश पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ३ ते ४ चोरटे धावत येत असल्याचा संशय आल्याने तेथील सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान व सतर्कता दाखवून त्याच्याजवळील बंदुकीतून हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात घबराट पसरली होती; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कारेगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. सोमवारी (दि.१७) मध्यरात्री दोनच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. याबाबत पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले, की राजेश पेट्रोलपंपाच्या समोर असलेल्या राजमुद्रा हॉटेलमधील वेटरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आपापसात किरकोळ भांडणे झाल्याने त्यातील काही वेटर पळत पंपाजवळ आल्याने पंपावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाला, ते चोरटे असल्याचा संशय आल्याने त्याने सतर्कता बाळगून बंदुकीतून हवेत गोळीबार केला.गोळीबाराची घटना पोलिसांना समजल्यावर स्वत: अशोक इंदलकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पो.कॉ. चंद्रकांत काळे, किशोर तेलंग, दत्तात्रय शिंदे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, भगवान निंबाळकर यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून रांजणगावला धाव घेतली. या घटनेची चौकशी केल्यावर ते चोरटे नसून हॉटेलमधील वेटर असल्याचे निष्पन्न झाले. असे असले तरी प्रसंगावधान राखून सुरक्षेसाठी बंदुकीतून गोळीबार केलेल्या सुरक्षारक्षकाची सतर्कता तसेच परिस्थितीचे भान ओळखून मोठ्या धाडसाने प्रसंगावधान राखून गोळीबार करून त्याने कर्तव्य बजावल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)
रांजणगावला सुरक्षारक्षकाचा गोळीबार
By admin | Published: November 19, 2014 4:33 AM