पुणे : वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडून त्याचा ताबा न देणे, वाढीव रक्कम भरण्यास धमकावून फसवणूक करणे व खंडणी मागणे याप्रकरणी न्यायालयीन आदेशानुसार भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा व इतरांवर पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कपांऊंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. २०१३ ते मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वकील असून, त्या पुण्यात राहतात. त्यांना मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांना त्यांच्या मित्रमंडळींकडून मंगलप्रभात लोढा यांच्या प्रकल्पातील सदनिका घेण्याचे सूचविण्यात आले. मंगलप्रभात हे ज्वाला रिअल इस्टेट प्रा.लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. आता त्यांचा मुलगा अभिषेक हा कंपनीचा अध्यक्ष आहे. मंगलप्रभात यांनी फिर्यादीशी संपर्क साधला.
सदनिकेचा व्यवहार हा पाच कोटी ५२ लाख रुपयांना ठरला. सुरेंद्रन नायर या आपल्या माणसाला त्यांच्या घरी पाठविले. बुकिंग म्हणून फिर्यादी यांनी सुरुवातीला ९ लाख रुपये मग वेळेवेळी ३ कोटी ९२ लाख दिले. मात्र नंतर लोढा यांनी फ्लॅटची किंमत वाढवण्यास सुरुवात केली. फिर्यादीने मागणी करूनही त्यांना फ्लॅट दाखविण्यात आला नाही.
वाढीव ४ कोटी रक्कम भरा अन्यथा अॅग्रीमेंट टू सेल हा करार रद्द केला जाईल, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. फिर्यादीचा फ्लॅट हडपून फसवणूक करीत खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.
मंगलप्रभात लोढा यांच्याशी 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, मला कोणत्याही तक्रारीची माहिती नाही. मी गेल्या ५-७ वर्षांपासून व्यवसायात नाही. त्यामुळे यावर मी भाष्य करू शकत नाही, असं सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार ही एक डिफॉल्टर आहे. तिने बऱ्याच वर्षांपासून तिची थकबाकी भरली नाही आणि त्यानंतर रेरानुसार लागू व्याज देण्यास नकार दिला आहे. आम्ही तिच्याविरूद्ध 12 महिन्यांपूर्वी डीफॉल्ट आणि रद्दबातल झाल्याबद्दल रेरा येथे गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी तिने याच प्रकरणात मुंबईतील संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मात्र त्याबाबतचे पुरावे ती देऊ शकली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले होते. तसेच कंपनीने काही चुकीचे केले नसल्याचे समोर आले होते, असे स्पष्टीकरण लोढा समुहाच्या प्रवक्त्याने दिले आहे.