पुणे : मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडीओ कुटुंबाला दाखविण्याबरोबरच सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची भीती दाखवित १५ लाख रुपयांची खंडणी मागून २ लाख ६० हजार रुपयांची रक्कम शिवीगाळ आणि मारहाण करीत वेळोवेळी वसूल करणा-या महिलेसह दोघांना खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेने अटक केली.
मिथुन मोहन गायकवाड ( वय २९, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह एक २१ वर्षीय तरुणी आणि एका व्यक्तीवर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली. फिर्यादीने यासंबंधी तक्रार अर्ज दिला. त्या अर्जाची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार फिर्यादी आणि त्याच्या मैत्रिणीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती घालत १५ लाख रूपयांच्या खंडणीपैकी अडीच लाख रुपये घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ३ सप्टेंबरला उर्वरित खंडणीच्या रकमेपैकी १ लाख रुपये हे दगडूशेठ गणपती मंदिराजवळ आणून दिले नाहीस, तर मैत्रिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानुसार खंडणीविरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपी गायकवाड याला १ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पोलीस हवालदार मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपूत, अतुल साठे, मपोहवा हेमा ढेबे, पोलीस नाईक नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमोल आव्हाड, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विजय कांबळे, पोलीस शिपाई प्रफुल्ल चव्हाण आणि अमर पवार यांनी ही कारवाई केली.
----------