पुणे :अपहरण झालेल्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीवरून मुलाच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाची माहिती देतो, असे म्हणून २ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय हणुमंत शिर्के (वय २७, रा. आळंदवाडी, ता. भोर) याला अटक केली आहे.
गेल्या आठवड्यात शहरातून एका मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस करीत आहेत. या मुलाचा तपास लागावा म्हणून त्याच्या पालकांनी फेसबुक व इतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून मुलाची माहिती देण्याचे आवाहन केले होते.
शिर्के हा भोर तालुक्यातील आळंद येथे एका कंपनीत काम करतो. त्याने ही पोस्ट वाचून त्यावर असलेल्या क्रमांकावर फोन केला. हा फोन अपहरण झालेल्याच्या पालकाचा असल्याची खात्री केली. त्यानंतर त्या पालकांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुमच्या मुलाची व त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती असल्याचे सांगितले. यावर या पालकाने त्याला मुलाचे व गाडीचे फोटो पाठविण्यास सांगितले. तेव्हा शिर्के याने अगोदर २ लाख रुपये दिल्याशिवाय काहीही पाठविणार नाही, असे सांगितले.
तेव्हा पालकांनी ही बाब पोलिसांना कळविली. त्याच्या फोनवरून पोलिसांनी शिर्के याचा माग काढला. तेव्हा तो भोरमधील आळंदवाडी येथे असल्याची माहिती समजली. त्याबरोबर गुन्हे शाखेचे पथक तातडीने तेथे पोहचले. त्यांनी अक्षय शिर्के याला ताब्यात घेतले. मात्र, त्याकडे कोणतीही माहिती नव्हती. केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचा गैरफायदा घेऊन त्याने पैसे उकळण्याचा प्लॅन रचला असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीने नागरिकांनी खोटी माहितीचे फोन करून त्रास देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.