पुणे : माहिती अधिकाराचा वापर करुन 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आशुतोष अरुण घोलप (वय 45, रा़ सिद्धीविनायक सोसायटी, भुसारी कॉलनी, कोथरुड) आणि माहिती अधिकार कार्यकर्ता रामचंद्र ज्ञानोबा फुगे (वय 65, रा़ शनि मंदिराजवळ, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी 20 लाखांच्या खंडणीची मागणी करुन 10 लाख रुपये खंडणी घेतली होती.
खंडणीची रक्कम शिवाजीनगर येथील हॉटेल गंधर्वमध्ये शनिवारी (दि.1) सायंकाळी पावणे आठच्या सुमारास स्वीकारताना पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकणी प्रशांत अजित अगरवाल (वय 31, रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल यांचा वर्धमान असोसिएटस ही बांधकाम कंपनी आहे़ त्यांनी बिल्डींगचे प्लॅन महापालिका कार्यालयात सादर केले होते. या बिल्डींग प्लॅनची माहिती रामचंद्र फुगे यांनी माहिती अधिकारात मागवून घेतली. त्यावर त्यांनी तक्रार केली होती. अगरवाल यांना तुमचे बांधकाम अनधिकृत असून ही तक्रार मागे घ्यायची असेल तर 20 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. त्यानंतर अगरवाल यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. अगरवाल यांनी त्यांना इतके पैसे देणे शक्य नाही, असे सांगून तडजोडीमध्ये 10 लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पैसे घेण्यासाठी त्यांना शनिवारी रात्री पावणे आठ वाजता शिवाजीनगर येथील हॉटेल गंर्धव येथे बोलाविले. अगरवाल यांनी 2 हजार रुपयांच्या 5 नोटा वर ठेवून त्याखाली त्याच आकाराचे आतमध्ये कोरे कागद बंडलच्या स्वरुपात ठेवले व ते पैसे स्वीकारताना पोलिसांनी दोघांना सापळा रचून रंगेहाथ अटक केली. दरम्यान, आरोपींनी अशाप्रकारे कोणाला फसवले असल्यास त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे हे करीत आहेत.