पुणे : एका व्यावसायिकाचे गेमिंग अकाउंट वापरून मिळालेल्या पॉईन्टच्या बदल्यात ३० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेला एक जण आयटी कंपनीत तर दुसरा नामांकित कंपनीत कामाला असल्याचे समोर आले आहे.
अमोल रमाकांत एकबोटे (वय २९) आणि सौरभ पाडुरंग माने (वय २५ दोघेही रा. बाणेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना ३ लाख रूपयांचा खंडणीचा पहिला हप्ता घेताना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी एका व्यावसायिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे. एका पार्टीमध्ये आरोपींची व फिर्यादी यांची ओळख झाली होती. लोट्स मोबाईल अपव्दारे ऑनलाईन क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कसिनो गेटवर बेटींग खेळण्यासाठीचा फिर्यादी यांचा लॉगिन आयडी व पासवर्ड आरोपी एकबोटे याने घेतला. त्यावरून बेटींग गेम खेळून ३० हजार पॉईन्ट जमा झाल्याचे फिर्यादी यांना सांगितले. या ३० हजार पॉईन्टचे ३० लाख रूपये देण्याची मागणी त्यांनी फिर्यादींकडे केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर एकबोटे व त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने अपहरण करुन कारमधून खेडशिवापूर येथे नेले. त्या ठिकाणी एकबोटेने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या पॅनकार्डचे फोटो काढून घेत आठवड्याला तीन ते चार लाख रूपये द्यायचे, असे सांगून कात्रज चौक येथे सोडले.
त्यानंतर फिर्यादी यांना ५ एप्रिल रोजी पुन्हा ३० लाखांपैकी ३ लाख रूपयांचा पहिला हप्ता देण्याची मागणी केली. याबाबत फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ३ लाखांची खंडणी घेताना पकडले. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
............अमोल रमाकांत एकबोटे हा आयटी कंपनीत नोकरीला आहे. तर, माने हा ऑनलाईन शैक्षणिक व्हिडीओ तयार करणार्या कंपनीत नोकरीला आहे, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.