पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान टेम्पोतून घेऊन जाऊन ते घरी पोहचविले नाही. टेम्पोचे लोकेशन हवे असेल तर ५ हजार रुपयांची अधिकची मागणी करुन पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करुन अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सनलाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अँड मुव्हर्सचे मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अभिनव अविनाश वर्मा (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रामदास शेलार, विजय पाटील, अश्विन रघुनाथ रायकर (वय २७, रा. धायरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्विन रायकर याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव वर्मा यांनी त्यांचे घरगुती सामान मुंबईतील घरी हलविण्यासाठी सनलाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स, धारेश्वर कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्स यांना दिले दिले. त्यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केशवनगर येथील घरातून ९ लाख १० हजार रुपयांचे घरगुती साहित्य व दुचाकी टेम्पोत भरून घेऊन गेले़ दुसर्या दिवशी त्यांच्या मुंबईतील घरी साहित्य पोहचले नाही. तेव्हा त्यांनी चौकशी करुन टेम्पो कोठे आहे, याची विचारणा केली. तेव्हा टेम्पोचे लोकेशन पाहिजे असल्यास आणखी ५ हजार रुपये द्यावे लागेल. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली.
त्यानंतर वर्मा यांनी मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले की, त्यांनी मुंबईला सामान न पोेहचवता तो वाटेतच रस्ता कडेला लावून अधिक पैसे मागत होते. अश्विन रायकर याला पकडल्यानंतर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.