पुणे : पौड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार देऊ नये, यासाठी पैशाची मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी मृताच्या मेव्हण्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुल जाधव हे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूडमधील एका ६१ वर्षांच्या व्यवसायिकाने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: कैलास मराठे हे फिर्यादी यांच्याकडे कामाला होते. कैलास मराठे याने पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ मार्च रोजी आत्महत्या केली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करून चौकशी सुरू केली होती. त्यात राहुल जाधव याने अकस्मात मृत्यू प्रकरणात कैलास मराठे यास आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, अशी तक्रार न देण्याचे बदल्यात आर्थिक तजवीज करावी, अशी मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.