पुणे : स्पाइसजेट या विमान कंपनीच्या आयटी यंत्रणेवर मंगळवारी रॅन्समवेअर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी पुणे विमानतळावर झाला असून, येथील विमान उड्डानांना बुधवारी सकाळी उशीर झाला. या प्रकारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
या सायबर हल्ल्यामुळे स्पाइसजेटच्या पाच ते सहा विमानांना उशीर झाला. तर, पुण्यात येणाऱ्या तीन विमानांना उशीर झाला असल्याची माहिती आहे. यामध्ये काही विमानांना २० मिनिटांपासून ते काहींना चार तास उशीर लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.
स्पाइटजेटकडून दिलेल्या माहितीनुसार, काही वेळात कंपनीच्या आयटी विभागाच्या पथकाने ही परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे काही विमानांना विलंब झाल्याने काही उड्डाणे रद्द करण्यात आली हाेती. दरम्यान, स्पाइसजेटचे तज्ज्ञ सायबर पोलिसांच्या संपर्कात असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रवासी विमानतळावर अडकून हाेते. त्यांना विमानतळ प्रशासनाकडून काही साेयीसुविधादेखील मिळाल्या नाही, असाही आराेप प्रवाशांनी केला आहे.