पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातात बळी पडलेल्यांची थट्टा करणारा वादग्रस्त रॅप तयार करणारा तरुण आर्यन निखरा याला पुणे पोलिसांनी चौकशी सत्राला उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. निखरावर आयपीसी कलम ५०९, आणि २९४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत आरोप आहेत.
पुणे शहर पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतरही आर्यन देव निखरा नावाचा हा कलाकार का हजर राहू शकला नाही. त्यामुळे पोलीस त्याच्यावर आता कोणती कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
व्हायरल झालेल्या या रॅप व्हिडिओने दुःखद घटनेचे असंवेदनशील चित्रण केल्याबद्दल व्यापक निषेध केला. सुरुवातीला हा कलाकार अपघातातील अल्पवयीन आरोपी असावा, असा कयास लोकांनी बांधल्याने गोंधळ उडाला होता. त्यांनतर अल्पवयीन मुलाच्या आईच्या स्पष्टीकरणाने सत्य समोर आलं आणि पुणे पोलिसांनी मूळच्या मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय आर्यन निखरा विरोधात गुन्हा दाखल केला.
पोस्ट व्हायरल केलेल्या "त्या" व्यक्तीचाही शोध सुरू :
आर्यन निखरा याने तयार केलेले अश्लील भाषेतील रॅप साॅंगचा व्हिडिओ व्हायरल करणारा इंस्टाग्राम खातेधारक पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर आहे. आर्यन निखराचा व्हिडिओ ज्या खात्यावरून व्हायरल करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या खात्याचा शोध घेऊन त्याचा जप्ती पंचनामा करण्याचं काम पुणे सायबर पोलीस करत आहेत.
पोलीस पुढे काय करणार?
नोटीस बजावूनही आर्यन चौकशीसाठी हजार न राहिल्याने पोलिसांनी त्याच्या आईला आणि मित्राला संपर्क केला आहे. त्यांनी ४ जूनपर्यंत येणार असल्याचे कळवले आहे. मात्र आर्यन चौकशीसाठी हजर राहिला नाही तर त्याचा मागोवा घेत पुणे सायबर पोलिसांचे पथक त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे, अशी माहिती सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लक्ष वेधण्याचा हाेता प्रयत्न :
स्वतःचा बचाव करताना एका निवेदनात निखराने सांगितले की, "पुणे पोलिसांनी माझ्यावरील आरोप वगळले पाहिजेत. वास्तविक घटनांपासून लक्ष हटवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर लक्ष्य केंद्रित केले जात आहे. अल्पवयीन व्यक्ती श्रीमंत कुटुंबातील आहे, मी एक मध्यमवर्गीय व्यक्ती आहे, त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या जागेवर मला तुरुंगात टाकतील असं मला वाटतं."