बारामती : सुपे (ता. बारामती) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुलीकडील तिघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय सुनील काळे याच्याविरोधात वडगाव निंबाळकर पीडित १४ वर्षीय मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार याप्रकरणी आरोपी काळे याच्यावर पोलिसांनी बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीकाळे याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुलीकडील तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ७ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीची मुलगी झोपलेली असताना अजय काळे याने तिला दमदाटी करत तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके अधिक तपास करत आहेत. दरम्यान आरोपी काळे याच्यावर दि. १० मे रोजी वढाणे येथे जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुलीकडील तिघा नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढाणे येथील प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यात आरोपींनी मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:10 AM