पुणे : बिगारी कामासाठी दिवसभर दोघेही घराबाहेर राहिल्यावर झोपडपट्टीत आपल्या १४ वर्षाच्या गतीमंद मुलीचे इतरांपासून संरक्षण व्हावे, म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला पुण्यातील मुलींच्या निवासी होस्टेलवर ठेवले़. पण तेथेच तिला शारिरीक अत्याचाराचा सामोरे जावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी येथे येणाऱ्या एका ५८ वर्षाच्या सीसीटीव्हीचे काम पाहणाऱ्यास अटक केली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, या मुलीचे आईवडिल बिगारी काम करीत असून मुंबईमधील झोपडपट्टीत आपण कामाला गेल्यावर तिची देखभाल करायला कोणी नाही़. अशा वस्तीत इतरांपासून तिचे सरंक्षण व्हावे, म्हणून त्यांनी तिला पुण्यातील या हॉस्टेलमध्ये ठेवले होते़. ही मुलगी काही दिवसांपूर्वी मुंबईला आपल्या घरी गेली होती़. तेथून ती पुन्हा पुण्याला येण्यास तयार नव्हती़. तेव्हा तिला परत पुण्याला घेऊन आल्यावर तिच्या आईवडिलांनी चौकशी केली़ ही मुलगी माधव वाघ आला की त्याला पाहून घाबरायची़. तेव्हा तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला़. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता़. या होस्टेलमध्ये सीसीटीव्ही सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी अधून मधून येत असे़. त्यावेळी त्याने या मुलीवर अत्याचार केले़. याची माहिती कोणाला सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी त्याने दिली होती़. कोथरुड पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.