पुणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती अतिशय गंभीर असून, सर्वसामान्य जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुरात अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मदतकार्य सुरू केले आहे. आता शासनाने कोणतेही आढेवेढे न घेता मदतकार्य करणाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी वेगाने हालचाल करणे आवश्यक आहे़, असे आवाहन भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते़ ते म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा धोका अधिक असल्याने, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधला आहे. अलमट्टी धरणातून ताशी २ लाख क्यूसेक विसर्ग करण्यास कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे. आणखी १ लाख क्यूसेक विसर्ग करावा, असा आग्रह करण्यात आला असल्याचेही भांडारी म्हणाले़