मागील आठवड्यात दररोज किमान तीनशेपेक्षा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु उपजिल्हा रुग्णालय इंदापूर, निमगाव केतकी शासकीय रुग्णालय व इतर ठिकाणी शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ज्या रॅपिड अँटिजन टेस्ट नुसता केसपेपर काढून केल्या जात होत्या. त्या कीट मिळत नाहीत असे सांगितले जाते म्हणून चाचण्या बंद पडल्या आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी बऱ्याच हालचाली कागदावर चाललेल्या दिसतात. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सातत्याने यासंदर्भात विशेष बैठक घेऊन सूचना करतात. शासनाकडून पाहिजे ते साहित्य मिळवून देतात मात्र सध्या मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोना रॅपिड टेस्ट किट उपलब्ध नाहीत म्हणून चाचण्या बंद पडल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील वर्षी पेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक पटीने कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. गावातील रुग्णांना आपल्या चाचण्या करून घ्यायचे आहेत. परंतु शासन स्तरावरून किटच उपलब्ध नाहीत, असे कारण सांगितले जाते. त्यामुळे टेस्ट कोरोना कोठे करायची याची पंचायत रुग्णांची झाली आहे. शहरी भागातील रुग्ण खासगीमध्ये आपली टेस्ट करतात. मात्र ग्रामीण भागातील रुग्ण अशा महागड्या टेस्ट करू शकत नाहीत. त्यामुळे काही दिवसातच कोरोना आजाराने सिरीयस होऊन या आजारात अनेकांचे बळी जात आहे. त्यामुळे टेस्ट किट कधी उपलब्ध होणार असा सवाल नागरिक करीत आहेत.
चौकट : " इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी बाहेर तर....
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित झालेल्या रुग्णांनी, शासकीय रुग्णालयात बेड संदर्भात चौकशी केली तर सर्व बेड फूल आहेत. ऑक्सिजनचा बेड शिल्लक नाही, अशी कारणे सांगितली जातात. त्यामुळे लाखो रुपये घालून खासगीत उपचार अनेकांना घ्यावे लागतात. परंतू सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण इंदापूर तालुक्याच्या शासकीय दवाखान्यात उपचार घेतात कसे? याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. असे नागरिकातून बोलले जात आहे.
मात्र इंदापूर तालुक्यात रॅपिड अँटिजन किटमुळे रुग्ण संख्या वाढेल या भीती पोटी, इंदापूर आरोग्य विभागाकडून रॅपिड किटची पुणे विभागाला मागणी करण्यात येत नसल्याचे आरोग्य खात्यातील एका कर्मचारी याने सांगितले.
तालुक्यात १६६ नवे कोरोना रुग्ण इंदापूर तालुक्यात रविवार (१६ मे) रोजी शहर व ग्रामीण भागात १६६ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर २६९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. पाच रुग्णांचा रविवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.अशी माहिती इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली. रॅपिड टेस्ट पुन्हा चालू करण्यात येतील, तालुका वैद्यकीय अधिकारी व संबंधितांनी या किट मागवले आहेत, अशी माहिती ठोंबरे यांनी दिली.