सांगवी : बारामती तालुक्यात गेली चार वर्षे अंगणवाडीसह बालकांच्या शारीरिक, बौद्धिक,विकासात झपाट्याने भर पडली. पोषण आहाराबरोबरच माझी अंगणवाडी स्वच्छ व सुंदर अंगणवाडी या उपक्रमाद्वारे बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी बालकांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण केली, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे केले.
शरदचंद्रजी पवार सभागृह पुणे येथे दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त बालकांना पोषण आहार मिळण्यासाठी रूपरेषा ठरविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, बारामतीचे बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांना निरोप देत मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. त्या दरम्यान मुंडे बोलत होते. पुढे ते म्हणाले कोरोना काळात शासकीय योजनांसह बालकांसाठी योग्य व नियमित आहार मिळण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फत बालकांसाठी विविध उपक्रम राबवून तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांत २०० हून अधिक सेंद्रिय परसबाग निर्माण करण्यात आल्या. पर्यावरणदिनानिमित्त बालकांच्या हस्ते वृक्षारोपण, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला पिण्याच्या पाण्याचा नळ, वीज कनेक्शन, डिजिटल अंगणवाडीसाठी विशेष प्रयत्नातून लोकसहभागासह जिल्हा परिषदेकडून टीव्ही मिळण्यासाठी परिश्रम घेत असे विविध विधायक कामे त्यांनी पार पाडली.
तसेच बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैयक्तिक व बाह्य स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकासासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. सकस आहाराच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीकडे वाटचाल चांगल्या रितीने पार पाडली. जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले.
फोटो ओळी: नागमवाड यांचा सन्मान करताना मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व दत्तात्रय मुंडे.