सोमेश्वरनगर : नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या नीरा देवघर धरणात ५६.१६ टक्के, भाटघर धरणात ४९.८६ टक्के, तर वीर धरणात ५९.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर गुंजवणी धरण भरले असून, ७५० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने वीर धरणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काल रात्रीपासून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारेचे विभागीय उपअभियंता डी. एम. डुबल यांनी दिली. या वर्षी जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने पाऊस पडणार की नाही, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. मात्र, आता गेल्या पंधरा दिवसांपासून धरणक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता तिन्ही धरणांनी ५० टक्केचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. रविवार दि. २० जुलैच्या आसपास धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु शुक्रवार २५ जुलैच्या आसपास पावसाचा जोर मंदावला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. धरण क्षेत्राबरोबरच नीरा खोऱ्यातही दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिरायती भागातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या तसेच रखडलेल्या उसाच्या लागणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील पेरण्यांना एक महिना उशीर झाला असला तरीही तूर, सोयाबीन आणि बाजरीच्या पेरण्या अजूनही होऊ शकतात, असे आघारकर अनुसंधान केंद्राचे प्रमुख अजित चव्हाण यांनी सांगितले.(वार्ताहर)
धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
By admin | Published: July 31, 2014 2:51 AM