पुणे : यंदा पाणीटंचाईची झळ दरवर्षीपेक्षा कमी असली तरी बारामती तालुक्यात मात्र पाण्यासाठी महिलांना वणवण करावे लागत आहे. जिल्ह्यात ११ टँकर सुरू असून, यापैकी एकट्या बारामतीत ८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात ११ टँकरने ८ गावे, ५0 वाड्यांवर सुमारे १८ हजार १३१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात बारामतीत ८ टँकरने ४ गावे, ४१ वाड्यावस्त्यांवर १४ हजार ९५ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात दोन टँकर सुरू असून, तीन गावे, ५ वाड्यावस्त्यांवर २ हजार ९८0 लोकसंख्येला टँकरने पाणी सुरू आहे. त्यानंतर दौंड तालुक्यात १ टँकरने १ गाव, ४ वाड्यांना पाणी पुरवले जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी ६ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तालुक्यातून आले आहेत. मात्र तेथे टँकरच सुरू झाले नाहीत. गेल्या वर्षी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. त्यामुळे तालुका पातळीवर मागणीनुसार त्वरित टँकर सुरूहोत असे. आता तहसीलदारांचे अधिकार काढून ते पुन्हा जिल्हाधिकारी यांना दिल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून तहसीलदाराकडे व त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. त्यानंतर मंजुरी दिली जाते. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने टँकर लवकर मिळत नाहीत. (प्रतिनिधी)
बारामती तालुक्यात तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2015 5:35 AM