बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील बहुतांश गावांना सुप्यातून सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, सुपे तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचे संकट आणखीन तीव्र होणार आहे. येथील तलावांतर्गत असणाऱ्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे, तर येथील तलावात असणाऱ्या चांदगुडेवाडी नळपाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी नसल्याने टँकर भरण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील गावांना टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. परिणामी, पाणीटंचाईचे संकट वाढले आहे. या परिसरातील बहुतांश गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. खडकवासला कालव्याद्वारे पाटस विभागात सध्या पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या कालव्याचे पाणी वरवंड तलावात घेऊन शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे सुपे परिसरातील गावांचे पाझर तलाव भरण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गट विकास अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्याची माहिती माजी सभापती पोपटराव पानसरे यांनी दिली. सुपे परिसरातील कुतवळवाडी, बोरकरवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, भोंडवेवाडी, बाबुर्डी, देऊळगाव रसाळ, मोरगावच्या वाड्या-वस्त्या आदी ठिकाणी सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर कारखेलचा टँकर मागणीचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे किमान सुपे तलाव टंचाईतून जनाईद्वारे भरल्यास या ठिकाणच्या विहिरीतून इतर गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार असल्याने याबाबत चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिल्याची माहिती गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी दिली. दरम्यान, खडकवासला, पाटस विभागाचे उपअभियंता व्ही. आर. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सध्या वरवंड तलावात १०० दशलक्ष घनफूट आणि दौंड नगर पालिकेच्या तलावात २५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. वरवंड तलावात सध्या १५० क्युसेसद्वारे पाणी येत असल्याची माहिती जनाई योजनेचे उपविभागीय अधिकारी आर. एन. सालगुडे यांनी दिली. त्यामुळे हा तलाव भरण्यास किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर सुपे तलावात पाणी सोडण्याचे नियोजन असून, शिल्ल्क राहिलेल्या पाणीसाठ्यावर तलाव भरण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सुपे परिसरात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: July 29, 2014 3:39 AM