श्रीकिशन काळे
पुणे : ताम्हिणी घाट हा अतिशय निसर्गसाैंदर्याने फुललेला परिसर आहे. या ठिकाणी अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी दिसून येतात. आता याच ठिकाणी केरळचे राज्य फुलपाखरू मलबार ब्रँडेड पीकॉक (Malabar banded peacock) दिसून आले आहे. हे फुलपाखरू अतिशय दुर्मिळ असून, यापूर्वी कोयना अभयारण्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसल्याची नोंद आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळले आहे.
फुलपाखरांच्या दुनियेतील एक सुंदर सदस्य म्हणजे मलबार ब्रँडेड पीकॉक हा होय. हे फुलपाखरू पुण्याजवळील ताम्हिणीच्या सदाहरित जंगलामध्ये फुलपाखरूप्रेमींना आढळले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील पर्यावरण विज्ञान विभागाचे विद्यार्थी रजत जोशी, कल्याणी बावा आणि फुलपाखरू अभ्यासक बगळे यांना हे फुलपाखरू दिसले असून, त्यांनी त्याचे छायाचित्रे काढली आहेत.
रजत जोशी म्हणाला,‘‘हा जीव अत्यंत विशिष्ट प्रकारच्या जंगलांमध्ये आढळतो. कोकण, दक्षिण भारत हे फुलपाखरांचा मुख्य अधिवास आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात हे यापूर्वी कधीच दिसले नव्हते. म्हणून हे पुणे जिल्ह्यासाठी एक पर्वणीच आहे.’’
भारतातील तिसरे सर्वात सुंदर फुलपाखरू
पश्चिम घाटात दिसणारे फुलपाखरू. मोरांसारखा रंग दिसत असल्याने मलबार ब्रँडेड पीकॉक असे नाव आहे. भारतातील तिसरे सर्वांत सुंदर फुलपाखरू म्हणून याकडे पाहिले जाते. हे फुलपाखरू केरळ, कर्नाटकात मुख्यत: दिसते. जानेवारी २०२१ मध्ये हे फुलपाखरू कोयना अभयारण्यात आढळून आल्याची नोंद आहे. त्यानंतर आता ताम्हिणीमध्ये दिसले. सर्वात वेगाने उडणारे हे फुलपाखरू आहे.
ताम्हिणी जंगल हे फुलपाखरांचे एक वरदान आहे. तिथे अनेक प्रकारचे फुलपाखरं आढळतात. सध्या येथे रानमारी, तसेच काही वेगळ्या फुलांना बहर आलेला आहे. ताम्हिणी येथे अनेक दुर्मिळ फुलपाखरांचे हक्काचे घर आहे.
- रजत जोशी, फुलपाखरू अभ्यासक
मलबार ब्रँडेड पीकॉक हे दुर्मिळ फुलपाखरू आहे. केरळचे ते राज्य फुलपाखरू असून, यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसले होते. आता जर ताम्हिणीत दिसले असेल, तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अतिशय घनदाट जंगलात हे दिसते आणि झरे, धबधबे यांच्या आजूबाजूला राहते. हिरव्यागार जंगलात मेल पीकॉक अधिक ॲक्टिव्ह पाहायला मिळते. तिरफळ, चिकूवर ते अंडी घालतात.
- डॉ. अंकुर पटवर्धन, फुलपाखरू संशोधक