श्रीकिशन काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भीमा नदीपात्रात अतिशय दुर्मिळ असा गोल तोंडाचा सकर मासा आढळून आला आहे. याला खवले नसून, त्याच्या अंगावर काटे आहेत. हा अनोखा मासा पळसदेव येथील एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडला आहे. हा मासा नदीतील स्थानिक माशांसाठी धोकादायक असून, मूळचा इथला नाही. त्यामुळे यांची संख्या वाढू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. मासा अभ्यासक रणजित मोरे यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली आहे.
पळसदेव (ता. इंदापूर) येथील भीमा नदीमध्ये सापडलेला हा मासा फिकट पिवळ्या रंगाचा आहे. या माशाच्या शरीरावर खवले नसून, काटे आहेत. तसेच, काळ्या व सोनेरी रंगाची सुंदर नक्षी व चमकदार डोळे आहेत. दीपक भुई या मच्छीमारच्या जाळ्यात सापडलेला हा आगळावेगळा मासा मच्छीमार व नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे. त्या संदर्भात रणजित मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा सकर फिश असल्याचे सांगितले. या माशाला जबडा नसून, वर्तुळाकार तोंड असते. त्याद्वारे तो त्याचे अन्न ओढून घेतो म्हणून त्याला सकर फिश असेही म्हणतात. हा मूळचा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळणारा मासा आहे. दिसायला सुंदर असल्याने हा मासा ॲक्वारियममध्ये ठेवला जातो, त्या उद्देशाने आपल्याकडे आला असण्याची शक्यता आहे असे सांगितले.
या अगोदर हा मासा आपल्याकडे कधीही सापडला नव्हता, असे 2009 च्या डॉ. जीवन सरवदे याच्या सर्वेक्षणात दिसून येते, असेही मोरे यांनी सांगितले. त्याबाबत नुकताच त्यांनी त्यांचा शोधनिबंध बायोइन्फोलेट या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केला आहे.
————————————————-
पुणे शहरात अनेकजण अक्वारियम मध्ये मासे पाळतात. पण ते मोठे झाल्यावर जागा नसल्याने ते नदीत किंवा नाल्यात सोडून देतात. तेच मासे पुढे उजनीकडे जातात आणि मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. त्यातूनच हा प्रकार होत असावा. नागरिकांनी ॲक्वारियम मधील असे मासा नदीत किंवा नाल्यात टाकू नयेत. कारण हा आपल्या इथला स्थानिक नाही.
- रणजित मोरे, मासा अभ्यासक
——————————————
शैवाल खाणारा मासा
हा मासा शैवाल खातो. त्यामुळे अमर नवले यांनी हा मासा त्यांच्या विहिर ठेवला आहे. तिथले शैवाल कमी व्हावे, यासाठी हा प्रयोग केला आहे. एकूणच हा मासा आपल्याकडी जैवविविधतेमधील नाही. त्याचा आपल्या जैवविविधतेवर काय परिणाम होईल, या विषयी अजून कोणी संशोधन केले नाही. त्याबाबत संशोधन करण्याचा मानस मोरे यांनी व्यक्त केला.
———————————-