पुणे : महात्मा गांधी यांची रक्षा घेऊन जाणा-या मद्रास (चेन्नई ) ते रामेश्वरम या खास रेल्वेचे चित्रीकरण....महात्मा गांधी यांनी १९४६ सालच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केलेला दक्षिण भारत दौरा....हरिजन यात्रा अशी महात्मा गांधी यांच्यासंबंधीच्या असंपादित फुटेजच्या तीस रिळांची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहे. सहा तासाचा कालावधी असलेल्या या रिळांमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयीच्या काही दुर्मिळ आठवणींचा अनमोल ठेवा आहे. विशेष म्हणजे या ३५ एमएम सेल्युलॉइड फिल्म्सचे चित्रीकरण पॅरामाऊंट, पाथे, वॉर्नर, युनिव्हर्सल, ब्रिटिश मुव्हिटोन,वाडिया मुव्हिटोनया एकेकाळच्या नावाजलेल्या स्टुडिओजकडून करण्यात आले आहे. येत्या २ ऑक्टोबरला संपूर्ण जग महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या हाती लागलेले फुटेज अत्यंत महत्वपूर्ण आहे. या फिल्म्स रिळांमधील काही फुटेज यापूर्वी काही लघुपटांत तसेच काही माहितीपटांत दिसून आले असले तरी चित्रीत केलेली काही क्षणचित्रे दुर्मिळ असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. महात्मा गांधी यांची रक्षा घेऊन जाणाऱ्या मद्रास (चेन्नई ) ते रामेश्वरम या खास रेल्वेचे चित्रीकरण पाहावयास मिळते. तामिळनाडू राज्यातून ही रेल्वे जात असताना मार्गावरील चेट्टीनाड, शिवगंगा, चिदंबरम, मदुराई या प्रमुख रेल्वेस्थानकावर अस्थींचे दर्शन घेण्यासाठी हजारो शोकाकुल लोकांनी केलेली गर्दी पाहावयास मिळते. तत्कालीन मद्रास शहरातील मरिना बीचवर अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या शोकाकुल जनसागराचेही तसेच रामेश्वर येथे सागरात अस्थिविसर्जन कार्यक्रमासाठी जमलेले तामिळनाडूतील विविध नेते आणि लोटलेल्या अफाट जनसमुदायाचे दर्शन यामध्ये घडते. याशिवाय या क्षणचित्रात महात्मा गांधी यांचे चिरंजीव मणिलाल गांधी यांचेही दर्शन घडते. महात्मा गांधी यांचे द्वितीय चिरंजीव असलेले मणिलाल गांधी हे इंडियन-ओपिनियन, या गुजराती-इंग्लिश साप्ताहिकाचे संपादक होते व हे मासिक द, आफ्रिकेतील दरबान येथून प्रसिद्ध होत होते. मणिलाल गांधी यांना विमानतळावर दाखविताना पडद्यावर महात्मा गांधीज सन असे टायटल कार्डही ( शीर्षक मथळा ) दाखविण्यात आले आहे. दुस-या एका फुटेजमध्ये महात्मा गांधी यांनी १९४६ सालच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केलेल्या द. भारत दौ-याचा तसेच हरिजन यात्रेचा समावेश आहे. इंडियन पिक्चर्सच्या या चित्रपटात महात्मा गांधी मनाप्पारीया रेल्वे स्थानकावर दिसत असून, तेथून ते मदुराई येथील मीनाक्षी मंदिराला तसेच पलानी आणि कुंभकोणमला भेटी देत असल्याचे फुटेज आहे. दुसऱ्या एका दृश्यात महात्मा गांधी सी. राजगोपालाचारी यांच्याबरोबर मद्रास येथे पार पडलेल्या दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास उपस्थित असलेले दिसत आहेत. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी आणि कस्तुरबा विविध काम करताना चित्रीत करण्यात आलेली दृश्येही पाहावयास मिळतात. त्यामध्ये गांधी नांगरताना, वृक्षारोपण करताना तर कस्तुरबा गायींना चारा घालतांनाचीदृश्ये आहेत. दुस-या एका रिळात महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जाताना राजपुताना ते इंग्लंड अस त्याचा बोटींमधील प्रवास क्षणचित्रांमधून दाखविण्यात आला आहे. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर कॅमेऱ्याकडे पाहत असताना दिसत आहेत. तर हरिपूर काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी घेतलेल्या दृश्यात सुभाषचंद्र बोस, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद आदी नेते दिसत आहेत. याशिवाय महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या भेटीची क्षणचित्रेही आहेत. महात्मा गांधी यांनी फ्रान्स तसेच ब्रिटनला दिलेल्या भेटीच्या चित्रीकरणही पाहावयास मिळते.महात्मा गांधी यांच्या निधनानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात झालेली शोकसभा तसेच युनोतील भारतीय प्रतिनिधींसह विविध राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी अर्पण केलेली श्रद्धांजली यांचाही फुटेजमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.............सेल्युलॉइड फॉरमॅट मधील हे ३५ एमएम फुटेज हे तसे चांगल्या अवस्थेत आहे, असे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले आहे. त्याचे लवकरच डिजिटल स्वरूपात परिवर्तन करण्यात येईल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचेसंचालकांनी सांगितले. यासंबंधी इतिहास तज्ज्ञांना तसेच जाणकारांना बोलावून त्यांच्याकडून या फुटेज संबधी अधिक माहिती मिळविण्यासंबंधी प्रयत्न केले जातील - प्रकाश मगदूम, संचालक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय
महात्मा गांधी यांचे दुर्मिळ फुटेज एनएफआयच्या खजिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 7:00 AM
महात्मा गांधींच्या १५० वी जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या हाती लागलेले फुटेज अत्यंत महत्वपूर्ण..
ठळक मुद्देसहा तासाचा कालावधी असलेल्या या रिळांमध्ये गांधी यांच्याविषयीच्या काही अनमोल ठेवा...