पावसाळ्यात भुईचाफ्याला पाने येतात, हिवाळ्यात याचा कंद पुन्हा मातीत जाऊन दडतो, तर उन्हाळ्यात यास बहर येतो व पांढऱ्या, जांभळ्या पाकळ्या असलेली आकर्षक फुले येतात. दिवसभर टवटवीत दिसणारे फुल संध्याकाळी कोमेजते व काही वेळाने खाली वाकलेले दिसते. रात्री पुन्हा याचा हिरवा देठ उगवत सकाळी पुन्हा आपला मंद सुगंध वातावरणात पसरवीत पुन्हा डोके वर काढते. आता पर्यंत अशी १५ फुले या ग्रीन गॅलरीतून उगवली आहेत, असे बापट यांनी सांगितले.
चाफ्याचे अनेक प्रकार आहेत, त्यात सोनचाफा, हिरवा चाफा, देवचाफा, भुईचाफा, कवठी चाफा, नाग चाफा यांचा समावेश आहे. भुईचाफा ही कंदवर्गीय वनस्पती आहे. ग्रीष्म ऋतूच्या शेवटच्या पर्वात जमिनीमधून एक दांडीव वर येते, पूर्ण ३-४ दिवसात एक फूल उमलते. गुलाबी छटा अति सुगंधीत अन् फूल सुकल्यावर पाने येतात. पुढील वर्षासाठी कंदात अन्नसंचय करून लुप्त होतात.
=================
मार्च-एप्रिल बहराचा काळ
या वनस्पतीचे शास्त्रीय नाव केंफेरिया रोटुंडा आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण-पूर्व आशियातील आहे. फुलोरा थेट जमिनीतून उगवल्यासारखा वाटतो म्हणून या वनस्पतीला भुईचाफा म्हणतात. याचे खोड भूमिगत व कंद स्वरूपाचे असून हिवाळ्यानंतर पाने येण्यापूर्वीच फुले दिसून येतात. फुले सुगंधी, आकर्षक व पांढरी असून मोठी पाकळी जांभळट असते. फुलांचा बहर ४-५ आठवडे टिकतो. पाने साधी, मोठी व पन्हळी देठाची असतात. पाने वरून हिरवी असून खालचा भाग जांभळा असतो. साधारण मार्च-एप्रिल हा भुईचाफ्याचा बहराचा काळ आहे.
——————————————-