पुणे : उरुळी कांचन येथे ऊसाच्या शेतात कापणी होत असताना अंदाजे १ महिन्याच्या दोन ‘रस्टी स्पॉटेड कॅट’ या मांजरीची पिल्ले सापडली. स्थानिकांनी पुणे वन विभाग आणि पुण्याच्या RESQ चॅरिटेबल ट्रस्ट वन्य टीमला याची माहिती दिली व त्यांनी एकत्रित पिल्लांना पुन्हा आईसोबत भेट घालून द्यायचे प्रयत्न सुरु केले.
पहिल्या रात्री आई पिल्लांना घेऊन जायला न आल्याने हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्लांना रेस्क्यू टीमने पुणे येथे नेऊन त्यांना अन्न-पाणी दिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा टीमने मांजरींना आईशी एकत्र भेट घडवायचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. मांजरीचं ‘रि-युनियन साईट’वर काही गोष्टी बदलण्यात आल्या आणि निगराणीसाठी लाईव्ह कॅमेरे लावले गेले. काही काळानंतर त्यांची आई आली व आमच्या टीमने तिला तिची पिल्ले घेऊन जाताना कॅमेऱ्यावर बघितले. दोन दिवस पिल्लांपासून लांब राहूनसुद्धा, शोध न थांबवता तिने तिची पिल्ले एका सुखरूप जागेवर हलवली.
—————————-
पहिल्यांदा रि-युनियन अपयशी झाल्यावर निराश होणे सोपे आहे आणि पुन्हा प्रयत्न न करावेसे वाटते, पण हा अनुभव रेकॉर्डवर सिद्ध झाला आहे की जर नेहमीच्या सेट-अपमध्ये रस्टी स्पॉटेड कॅटच्या वागणुकीप्रमाणे काही बदल केले गेले तर, २४ तासांनंतरही असे प्रयत्न यशस्वी होणे शक्य आहे.
- नेहा पंचमिया, आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट